आणि बुद्ध हसत आहे.
आणि बुद्ध हसत आहे.
इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात असलेली गणराज्यात्मक लोकशाही व्यवस्था ध्वस्त करु पाहणा-या साम्राज्यवादी शक्तींना बळकटी प्राप्त होऊ लागली. भौतिक,सामाजिक,राजकीय व वैचारिकदृष्टया संपन्न अशी ही गणराज्यं 'विनाशकाले विपरित बुद्धी' या उक्तीनुसार आपापसात संघर्ष करत,साम्राज्यवादी एकाधिकारशाही प्रवृत्तीला बळी पडत होती. दुस-या बाजूला तत्कालीन वैदिक धर्म स्वतःच्या निर्माण केलेल्या अभेद्य तटबंदयांमध्ये अडकून पडला होता. धर्म म्हणजे कर्मकांड आणि समाज म्हणजे न बदलता येणारी जातीय उतरंड असा समज वैदिक धर्ममार्तडांनी दृढमुल केला होता. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस भरडला जात होता. एकूणच राजकीय असो वा धार्मिक अशा दोन्ही स्तरांवर क्रौर्य,व्यभिचार आणि अविवेक यांनी समाजाला ग्रासले असतांना,'करुणा-शील-प्रज्ञा' हा महामंत्र देणा-या भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. कपिलवस्तूच्या या शाक्यवंशीय राजपुत्राने जगातील पहिल्या विश्वव्यापक अशा बौद्ध धर्माची स्थापना केली. अलौकिक,काल्पनिक, अगोचर, कुट व गुढ संकल्पनांची मांडणी म्हणजे धर्मसिद्धांत आणि त्यांचा काथ्याकूट करणे म्हणजे धर्मचर्चा ही धर्मसंकल्पना झाली होती. असे धार्मिक गोंधळ करण्यात पारंगत असणा-यांना महाविद्वान धर्ममार्तड समजले जात होते. यामुळे समाजाच्या निकोप नियमनासाठी असलेला धर्म समाजविन्मुख व विकृत होऊन समाजाकडेच पाठ करुन बसला होता. धर्माच्या या स्वरुपाची संपूर्ण उपेक्षा करत,भगवान बुद्धांनी लौकिक जीवनाला महत्व देणारा धर्म जगाला दिला. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने भाकड ठरलेल्या धर्मसिद्धांतांना तिलांजली देत,त्यांनी आपल्या नवधर्मात संसारदुःखाच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. मृत्यूपश्चात दुःखापेक्षा संसारदुःखाचे निवारण करण्याठी त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग विश्वाला दिला.यासाठी सिद्धांतांच्या जंजाळापेक्षा आत्मभान, आत्मपरीक्षण व स्वानुभव महत्वाचा मानला. 'अतः दीप भव' हा महामंत्र देत केवळ स्वानुभवाच्या,स्वप्रज्ञेच्या कसोटीवर जे सिद्ध होईल तेच सत्य माना,हे सांगणारा जगातील एकमेव धर्मसंस्थापक म्हणजे भगवान बुद्ध. याठिकाणी धर्मग्रंथ,धर्ममार्तड,धर्मसिद्धांत एवढेच नव्हे तर स्वतः बुद्ध सांगताय म्हणूनही ते स्वीकारता कामा नये,हे सांगण्याचे धैर्य जगात केवळ बुद्धांनी दाखविले. त्यांचा धर्म वर्तमानात जगण्याचा संदेश देतांना,भूतकाळाचे ओझे भिरकावून,भविष्याची चिंता सोडण्याचा महान संदेश देतो. आपला वर्तमान आपले भविष्य निश्चित करतो,यामुळे वर्तमानाचा सुयोग्य वापर करण्यावर बुद्धांनी भर दिला. भूतकाळाचा विचार वा तद्विषयक पश्चाताप हा केवळ मुर्खपणा आहे. आज जग भौतिकदृष्टया संपन्न,सुलभ व सुखी करण्याचा अविरत प्रयत्न मानव करत आहे. उपेक्षित-वंचित समाज घटक जगण्याच्या प्रश्नांशी कराव्या लागणा-या संघर्षाने अस्वस्थ व अशांत असल्यास त्यात काही नवल नाही. मात्र भौतिकदृष्टया सर्वथा संपन्न जीवनाचा उपभोग घेणा-या समाज घटकात अस्वस्थता व अशांती असण्याचे वा अपूर्णतेची वेदना असण्याचे कारणच असू शकत नाही. असे सर्वसाधारणपणे समजल्या जाते;परंतु हे अर्धसत्य आहे. हा संपन्न समाजही या प्रश्नांनी तेवढाच त्रस्त आहे. उपेक्षित-वंचितांपासून ते संपन्नांपर्यत सुख-शांती-समाधान देण्याची हमखास खात्री देणा-या बुवा-बाबा आणि त्यांचे संप्रदाय यांची रेलचेल संपूर्ण जगात असलेली आपल्याला पहावयास मिळते. आपण ज्याची तीव्र ईच्छा व्यक्त करतो,ते प्रत्यक्षात आपल्याला जीवनात प्राप्त होते,हे ठामपणे प्रतिपादित करणारे 'सिक्रेट' सारखे वर्ल्ड बेस्ट सेलर पुस्तकांनीही जगात धुमाकुळ घातला आहे. भारतीयांनी जगातील अंतिम रहस्य गवसल्याप्रमाणे हे पुस्तक डोक्यावर घेतले. कारण आपल्याला आपल्याच भगवान बुद्धांनी सांगितलेल्या या महान मंत्राचे विस्मरण झाले वा आपल्याला तो माहितच नाही. आपले तीव्र ईच्छित स्वप्न प्रत्यक्षात साकार होते,हे सर्वप्रथम जगात भगवान बुद्धांनीच सांगितले होते. हे सांगतांना त्यांनी आणखी काही सांगितले होते,त्याकडे मात्र सिक्रेटकारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले जाणवते. बुद्धांनी या तत्वाचा संबंध चमत्कार अथवा दैवी शक्ती यांच्याशी न जोडता आपल्या कर्माशी जोडला. एखादे ध्येय साध्य करण्याची आपण तीव्र ईच्छा बाळगली आणि तिला उपयुक्त कर्माची जोड दिल्यास किंवा आपण त्यासाठी उपयुक्त असलेली सर्व कर्मे करत असल्यास निश्चितच आपल्याला त्या ध्येयाची प्राप्ती होते,याचा ठाम विश्वास बुद्धांनी दिला. त्याचबरोबर ते एक अत्यंत महत्वाचा ईशाराही देतात की यासाठी ध्येय वा स्वप्न निश्चित करतांना आपला विवेक जागृत ठेवा. कारण आपले हे ईच्छित प्रत्यक्षात अवतरल्यावर ते जनहितास बाधक तर होणार नाही,याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. भगवान बुद्ध धार्मिक,सामाजिक व राजकीय अशा सर्वच स्तरांवर लोकशाहीसाठी अत्यंत आग्रही होते. अशा कोणत्याही क्षेत्रातील युद्धाला वा जीवघेण्या स्पर्धेला त्यांचा विरोध होता. माणसाने माणसाला मारणे,त्याचे शोषण करणे,आपसात वैरभाव बाळगणे म्हणजे धर्म होऊ शकत नाही. असीम करŠणा आणि प्रेमच बहुजन हिताय बहुजन सुखाय असते. हा भगवान बुद्धांचा संदेश कलिंगच्या युद्धात विजयी झालेल्या;परंतु मानव म्हणून पराभूत ठरलेल्या सम्राट अशोकासारख्या संवेदनशील राज्यकर्त्याच्या जेंव्हा लक्षात आला,तेंव्हा तो बुद्धांना शरण गेला. परिणामी अखंड आशिया खंड बौद्ध तत्वज्ञानाने व्यापला गेला. जपान व चीन सारख्या आशियायी महासत्ता बौद्ध राष्ट्र आहेत. अखिल विश्वातील लोकांचा कल बौद्ध तत्वज्ञानाकडे वाढत आहे. यामुळेच पाश्च्यात्य देशांमध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचे तत्वज्ञान याविषय सर्वाधिक लेखन व चिंतन होत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने नोव्हेबर २००६ मध्ये प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार वर्ष २००६ मध्ये एकटया भारतात तीस लाख लोकांनी बौद्ध धम्म दिक्षा घेतली. अमेरिका आणि युरोपातही बौद्ध धम्म जीवनशैली म्हणून स्वीकारण्याचे प्रमाण वाढत आहे. सन २००९ मध्ये जिन्हेवा येथील 'आंतरराष्ट्रीय धार्मिक व आध्यात्मिक संघटने'ने बौद्ध धर्माला जगातील सर्वश्रेष्ठ धर्म म्हणून सम्मानीत केले.धर्म म्हणून नाही, केवळ जगण्याचे तत्वज्ञान म्हणून जरी आपण बुद्धांकडे आपुलकी आणि गांर्भीयाने पाहिले असते,तरी आज आपल्या भारतीय समाजात निर्माण झालेल्या तटबंदया तोडण्यासाठी आपल्याला दुस-या बुद्धाची म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची वाट पहावी लागली नसती. सर्व जग भगवान बुद्धाकडे पाहत आहे आणि आपला हा बुद्ध मात्र त्याच्याकडेच परका म्हणून पाहणा-या त्याच्या स्वतःच्या भारतीयांकडे पाहत हसत आहे.
Comments
Post a Comment