Skip to main content

डुक्कर


डुक्कर : (वराह, सूकर). आर्टिओडॅक्टिला गणातील सुइडी कुलातील सुइस वंशातील हा प्राणी आहे. लठ्ठ शरीर, समखुरी (पायावरील खुरांची संख्या सम असलेले) आखूड पाय, जाड कातडे, आखूड राठ केस, सुलभ हालचाल होणारे लांबोळके तोंड, आखूड वळलेले शेपूट असे डुक्कराचे सर्वसाधारण वर्णन करता येईल. पूर्ण वाढ झालेल्या डुकरास ४४ दात असतात व त्यांची रचना कृंतक (कुरतडणारे) दात / , सुळे /२ , अग्रचर्वणक /, दाढा / अशी असते. काही रानटी डुकरांचे सुळे बाहेर आलेले असतात. डुक्कर मुंडी खाली घालून जमिनीलगत तोंड घेऊन चालते. डुक्कर हा सर्वभक्षी (शाकाहारी व मांसाहारी) प्राणी आहे.

यूरोपातील ‘पॅलिओकॅरीस’ हे सु. २·५–३ कोटी वर्षांपूर्वीचे प्राणी सुइडी कुलातील प्राण्यांचे खरेखुरे पूर्वूज होत. मायोसीन कल्पात (सु. २ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) ते नामशेष होण्यापूर्वी त्याचा भारत व आफ्रिका या प्रदेशांत प्रसार झाला होता. हल्ली अस्तित्वात असलेल्या जंगली तसेच माणसाळलेल्या जातींचे पूर्वज मायोसीन कल्पाच्या शेवटीशेवटी यूरोपमध्ये दिसले व प्लायोसीन कल्पात (सु. १·२ कोटी ते लाख वर्षांपूर्वीच्या काळात) त्यांचा आशिया खंडात प्रासार झाला. यूरोप व भारतात सापडलेले डुकराचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) नवपाषाण युगातील (ख्रि. पू. ९००० ते ८००० वर्षांच्या काळातील) आहेत आणि ते कुत्रा व गायीगुरांच्या जीवाश्मांशेजारीच सापडल्यामुळे डुक्कर हा प्राणी त्याच सुमारास माणसाळला गेला असावा, असे अनुमान निघते. तथापि एका चिनी संशोधकांच्या मते डुक्कर हा प्राणी ख्रि. पू. २९०० मध्ये पूर्व आशियात माणसाळला गेला असावा. युरोपातील काही नोंदींनुसार हा काळ ख्रि. पू. १५०० असावा.

युरोपातील रानटी डुक्कर (सुस स्क्रोफा) आणि चीन, जपान व पूर्व आशियातील रानटी डुक्कर (सुस व्हिटॅटस-सुस-इंडिकस) यांच्यापासून जगातील सर्व जंगली तसेच आधुनिक माणसाळलेल्या जाती निर्माण झाल्या आहेत.

प्राचीन काळी ग्रीसमध्ये डुक्कर हे सुपीकतेचे प्रतीक मानले जात असे. डिमीटर ही ग्रीक देवता डुकराला पवित्र मानते. ईजिप्तमध्ये ओसायरिस या देवाच्या सन्मानार्थ वर्षातून एक दिवस डुकराचे मांस खात असत, तर उत्तर यूरोपमध्ये हिवाळ्यात डुक्कर मारून खात व त्याची हाडे बियांबरोबर जमिनीत पुरून ठेवीत. न्यू गिनीमध्ये डुकरांना अजूनही पवित्र मानण्यात येते, तर जपानमध्ये ज्या डुकरांच्या नरांची देशातील डुकरांचे कळप सुधारण्यास मदत झाली. त्यांची देवळे बांधण्यात आली आहेत. डुकरांना पवित्र मानले गेल्यामुळे फक्त पवित्र माणसेच त्यांच्या सान्निध्यात येत व सर्वसाधारण माणसे त्यांपासून दूर राहिली. परिणामी डुक्कर हा पाळावयाचा प्राणी नाही व तो घाणेरडा आहे, असा गैरसमज रूढ झाला. ज्यू व मुसलमान यांना डुकरांचे मांस निषिद्ध आहे. ग्रीक व रोमन लोक डुकराच्या मांसाचे अनेक खाद्य प्रकार करण्यात कुशल होते.

अग्निपुराण  या ग्रंथात वराह हा विष्णूचा तिसरा अवतार आहे, असा उल्लेख आहे. भारतातील प्राचीन वैद्यकशास्त्रातील राजवल्लभ नावाच्या ग्रंथात डुकराचे मांस वातहारक, बलवर्धक पण बद्धमूत्र करणारे आहे तर राजनिघंटु ग्रंथात ते वीर्यवृद्धी करणारे आहे, असे लिहिले आहे.

स्पेन, इंग्लंड व इतर देशांतील लोकांनी इ. स. १५०० मध्ये अमेरिकेत वसाहती केल्या त्या वेळी डुकरे बरोबर नेली. कुत्रे आणि भाले यांच्या साहाय्याने घोड्यावर बसून डुकराची शिकार करण्याची प्रथा अनेक देशांत होती परंतु भारताशिवाय इतर देशांत हा खेळ आता बंद झाला आहे. भारतात एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश सैनिक हा खेळ हौसेने खेळत असत.

भारतामध्ये डुकरांचे मांस खाणाऱ्यांची संख्या बरीच कमी असल्यामुळे सु. १९५० सालापर्यंत डुकरे पाळण्याची पद्धत खऱ्या अर्थाने जवळजवळ प्रचारात नव्हती, असे म्हटले तर वावगे होणार नाही. तथापि खेडेगावातून व लहान शहरातून स्वच्छता राखण्याच्या कामी ह्या प्राण्याचा सर्रास उपयोग अद्यापही काही प्रमाणात होत आहे. त्यांच्या जोपसनेची काहीही काळजी घेतली जात नसल्यामुळे गावातील घाण वा उष्टे खरकटे खाऊन ती आपली उपजीविका करतात. वाढ पूर्ण झाल्यावर त्यांचे मालक मांस उत्पादनासाठी त्यांची रवानगी मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे करीत असतात.

जागतिक अन्न व शेती संघटनेच्या अंदाजाप्रमाणे भारतात १९७० साली ४८ लक्ष डुकरे होती. जगातील डुकरांची एकूण संख्या ६२ कोटीच्या आसपास आहे. यांपैकी ३५ टक्के चीनमध्ये तर ब्राझील, रशिया व अमेरिका यांमध्ये प्रत्येकी १० टक्के आहेत. यांशिवाय दक्षिण अमेरिका व आफ्रिका येथील डुकरांची संख्याही बरीच आहे. भारतातील एकूण वार्षिक मांसोत्पादनात डुकराच्या मांसाचे प्रमाण फक्त ५ टक्के आहे. (१९६६–६७).

जाती : जगातील सर्व देशांतील पाळीव डुकरांच्या जाती रानटी डुकरापासून निर्माण झाल्या आहेत. यूरोप, इंग्लंड व अमेरिका या प्रदेशांतील जाती प्रामुख्याने आग्नेय आशियातील चिनी व सयामी जातींच्या डुकरांचा स्थानिक डुकरांशी संकर करून तयार झालेल्या आहेत. पोलंड चायना या जातीच्या नावावरून हे सहज लक्षात येते. याच जातीच्या डुकरांचा उपयोग करून बेल्टस्‌व्हिल क्र. १ व मिनेसोटा क्र २ या अमेरिकेतील जाती निर्माण झाल्या. हेच तेथील सर्व जातींच्या डुकरांचे पूर्वज आहेत. संकरासाठी निवडण्याच्या जातींचे वर्गीकरण प्रायः डुकरापासून मिळणाऱ्या बेकन व पोर्क हे मांसाचे प्रकार व चरबी यांवरून केलेले आहे. चरबीचे डुकरे धिप्पाड, सु. २०० किग्रॅ. वजनाची असून त्यांत चरबीचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंतसुद्धा असू शकते. बेकनची डुकरे मध्यम चणीची, वजनाला ७५ किग्रॅ.च्या आसपास असतात. पोर्कची डुकरे ५० किग्रॅ. ते ४०० किग्रॅ. पर्यंत वजनाची असू शकतात. डुकरांच्या जाती, उपजाती व स्थानिक प्रकार यांची जगातील संख्या ३०० च्या आसपास आहे. या सर्व जाती धंदेवाईक दृष्टिकोनातून निर्माण केल्या गेल्या आहेत. यांतील काही प्रसिद्ध जातींची माहिती येथे दिली आहे.


मोठा पांढरा यॉर्कशर नर
मोठा पांढरा यॉर्कशर नर

मध्यम पांढरा यॉर्कशर नर
मध्यम पांढरा यॉर्कशर नर

मोठी पांढरी यॉर्कशर मादी
मोठी पांढरी यॉर्कशर मादी

  

मध्यम पांढरी यॉर्कशर मादी
मध्यम पांढरी यॉर्कशर मादी

हँपशर नर
हँपशर नर

हँपशर मादी
हँपशर मादी

   

  

टॅमवर्थ नर
टॅमवर्थ नर

टॅमवर्थ मादी
टॅमवर्थ मादी

लँड्रेस नर
लँड्रेस नर

  

लँड्रेस मादी
लँड्रेस मादी

परदेशी जाती : डुकरांच्या सर्व आधुनिक जाती इंग्लंडमध्ये व यूरोपमध्ये तयार झालेल्या आहेत. उत्तम प्रतीचे जास्तीत जास्त बेकन किंवा चरबी हे लक्ष्य ठेवून या जाती निर्माण करण्यात आल्या आहेत. खास अमेरिकन म्हणून समजल्या गेलेल्या व चरबीसाठी प्रसिद्ध असलेल्या जातींचे पूर्वज इंग्लंडमधील सुधारलेल्या जातींची डुकरेच आहेत. इंग्लंड व अमेरिका या देशांतून सुधारित जातींच्या डुकरांची आयात करून त्या त्या देशात आणखी वैशिष्ट्यपूर्ण जाती निर्माण झाल्या.


बर्कशर : इंग्लंडमधील सुधारलेल्या जातींपैकी सर्वप्रथम निर्माण झालेली ही जात आहे. या जातीच्या डुकरांच्या उत्पादकांचा १८८५ मध्ये एक संघ स्थापन करण्यात आला व त्या संघाने जातीची वैशिष्ट्ये ठरविली. काळा रंग पुढे झुकलेले उभे कान आखूड चेहरा शेपटीचे टोक, पाय व चेहरा यांवर पांढरे केस नराचे ३८० किग्रॅ. पर्यंत तर मादीचे ३०० किग्रॅ.च्या आसपास वजन ही ह्या जातीची वैशिष्ट्ये आहेत. प्रमुख्याने पोर्ककरिता ही जात प्रसिद्ध आहे.

मोठे पांढरे यॉर्कशर : इंग्लंडमधील यॉर्कशर परगण्यातील ही जात आहे. आकारमानाने मोठी, लांबट चेहऱ्याची, तांबूस त्वचा व मऊ केस असलेली व ४०० किग्रॅ. च्या आसपास वजन असलेली ही डुकरे बेकनसाठी प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या हवामानांत ह्या जातीची डुकरे चांगली वाढतात. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांतून भारतात या जातीच्या डुकरांची आयात केली आहे.

मध्यम पांढरे यॉर्कशर : मोठे पांढरे व लहान पांढरे यॉर्कशर यांच्या संकराने इंग्लंडमध्ये तयार झालेली ही जात आहे. ह्या जातीचे स्वतंत्र अस्तित्व १८८५ मध्ये प्रस्थापित झाले. ह्या जातीची डुकरे मध्यम आकारमानाची, रंगाने पांढरी, आखूड डोक्याची, बसक्या तोंडाची, तोंड वर उचलल्यामुळे मानेला बाक आलेली, दोन कानांमधील रुंदी बरीच असलेली व ३४० किग्रॅ.पर्यंत वजन असलेली असतात. ही डुकरे पोर्ककरिता प्रसिद्ध आहेत. भारतात या जातीच्या डुकरांची आयात केली आहे.

लँड्रेस : डुकरांची ही जात मूळची स्वित्झर्लंडमधील आहे. मध्य व पूर्व यूरोपमधील स्वीडन, डेन्मार्क आणि जर्मनी या देशांत या जातीची डुकरे आढळतात. ⇨आनुवंशिकीतील तत्त्वाप्रमाणे ज्यांची प्रजा उत्कृष्ट निपजली आहे, अशा नरांचाच प्रजननासाठी उपयोग करून डेन्मार्कमध्ये १८९० पासून या जातीत सुधारणा घडवून आणल्यामुळे या जातीची उत्तम प्रतीची डुकरे डेन्मार्कमध्ये आहेत.  डेन्मार्कमधून या जातीच्या डुकरांची निर्यात होऊ देत नाहीत. स्वीडनमध्येही या जातीच्या उत्कृष्ट डुकरांचे प्रजनन (पैदास) चालू आहे. प्रत्येक डुकराला १,००० पौंड किंमत देऊन १९५३ मध्ये स्वीडनमधून इंग्लंडमध्ये या डुकरांची आयात केली गेली. त्यामुळे जगातील उत्पादकांचे या जातीकडे लक्ष वेधले पसरट कानांची ही पांढरी डुकरे बेकन आणि हॅमकरिता प्रसिद्ध आहेत.

हँपशर : अठराव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्लंडमधून वेसेक्स सॅडलबॅक या जातीच्या डुकरांची आयात करून अमेरिकेत ही जात निर्माण करण्यात आली. ही डुकरे काळ्या रंगाची असून मानेच्या मागे व पुढील पायांवर शरीराभोवती पांढऱ्या केसांचा पट्टा असतो. या जातीची डुकरे लहान असून ती बेकनकरिता तसेच बहुप्रसवी म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

टॅमवर्थ : उत्कृष्ट बेकनकरिता प्रसिद्ध असलेली या जातीची डुकरे सोनेरी तांबूस रंगाची असून ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंडमध्ये आढळतात. इंग्लंडमधील स्टॅफर्डशर परगण्यातील जंगली डुकरापासून ही जात पैदा झालेली आहे. लांबट डोके व अरुंद लांबोळे तोंड, सरळ उभे कान असे या जातीतील डुकरांचे वर्णन असून ती बहुप्रसवी म्हणून प्रसिद्ध आहेत.

पोलंड चिनी–चिनाज : पोलिश व मोठे चायना या जातींच्या संयोगातून १८३५–७० च्या दरम्यान ही जात बटलर व वॉरन या परगण्यात निर्माण करण्यात आली. या जातीच्या डुकरांचा रंग काळा असून फक्त तोंड, पाय व शेपटीच्या टोकाचा रंग पांढरा असतो. चरबीसाठी ही डुक्करे प्रसिद्ध असून अमेरिका व चिलीमध्ये आढळतात.

स्पॉटेड स्वाइन : ही डुकरे पोलंड चायनासारखीच काळ्या रंगाची असून अंगावर पांढऱ्या रंगाचे पुष्कळ ठिपके असतात. अमेरिकेतील इंडियाना राज्यातील ठिपके असलेल्या स्थानिक डुकरांशी पोलंड चायना व इंग्लंडमधून १९१४ मध्ये आयात केलेल्या ग्लाउसेस्टर या जातींच्या संयोगाने ही जात निर्माण केली गेली. बव्हंशी अमेरिकेत आढळणारी ही डुकरे चरबीसाठी प्रसिद्ध आहेत.

ड्युरोक : न्यूयॉर्कमधील ओल्ड ड्युरोक व न्यू जर्सिंमधील रेडजर्सी या जातींच्या संकराने ही जात १८२२–७० च्या दरम्यान अमेरिकेत निर्माण करण्यात आली. तांबड्या रंगाची ही डुकरे चरबीसाठी प्रसिद्ध आहेत. मका खाऊन चांगल्या तऱ्हेने पोसल्या जाणाऱ्या ह्या जातीचा प्रसार अर्जेंटिना, कॅनडा, चिली व यूरग्वाय या देशांत झाला आहे. 

कँटोनीस : दक्षिण चीनमधील काळ्या पांढऱ्या रंगाची ही डुकरांची जात आहे. या जातीच्या माद्या चांगल्या प्रजननक्षम असून प्रत्येक वेळी दहा पिले उत्तम प्रकारे पोसतात. वृक्ककृमी व यकृतपर्णकृमी रोग ह्या जातीच्या डुकरांना सहसा होत नाहीत.

यांशिवाय उष्ण हवामानाच्या आशियामध्ये चिनी, मलायी तसेच चरबीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाली, सुंबा, फिलिपीन्समधील इलोकॅनो ही काळी पांढरी डुकरे आणि जलजाला व बर्कशर यांच्या संकरापासून निर्माण झालेली बर्कशाला ह्या जाती प्रसिद्ध आहेत.


भारतातील जाती : भारतीय रानटी डुक्कर : (सुस स्क्रोफा क्रिस्टॅटस). हा जंगली प्राणी असून भारतातील जंगली प्रदेशातून सर्वत्र आढळतो. हिमालयामध्ये ४·५ किमी. उंचीपर्यंत याची वस्ती आहे. सर्वसाधारणपणे १·५ मी. लांब, ७० ते ९० सेंमी उंच व १४० किग्रॅ. पेक्षा अधिक वजनाची ही डुकरे असून ती चांगलीच चपळ आहेत व ती दहा ते वीसच्या कळपामध्ये भटकतात. लहान असताना त्यांचा रंग करडा असतो, पण वयस्क झाली म्हणजे चिंचोक्याच्या रंगात पिवळट झाक असलेल्या रंगाची दिसतात. अंगावरील तुरळक राठ केस हे त्यांचे वैशिष्ट्य असून मानेच्या मागच्या भागापासून पाठीपर्यंत राठ काळ्या केसांची आयाळ असते. वरचे व खालचे सुळे मोठे असून ते तोंडाबाहेर वळलेले दिसतात.

ठेंगू : (सुस सॅलॅव्हॅनियस). साधारणतः ३५ सेंमी. उंच, ७० सेंमी. लांब व ८ किग्रॅ. वजन असलेल्या ह्या जातीची डुकरे नेपाळ, भूतान आणि आसामकडील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात १० ते २० च्या कळपात भटकताना आढळतात. ही डुकरे काळसर डुक्कर विटकरी रंगाची असून त्यांना स्पष्ट अशी आयाळ नसते, पण त्यांच्या मानेच्या मागील भागावर व पाठीवर लांब केस असतात.

देशी : अनेक वर्षांपासून जंगलातील रानटी डुकरे हळूहळू माणसाळत जाऊन ही जात निर्माण झाली आहे. भारतातील निरनिराळ्या भागांत त्यांचे रंग, आकार, सवयी यांत बरीच विविधता आढळते. काळा, विटकरी, मळकट राखी हे सर्वसामान्य रंग या जातीच्या डुकरांत आढळतात. लांब निमुळता चेहरा, बाकदार पाठ, पुठ्ठ्याचा भाग उतरता, पायाच्या अर्ध्यापर्यंत पोहोचणारी टोकाला गोंडा असलेली शेपटी, पाठ व मान यांवर राठ व दाट पण बाजूला तुरळक असणारे केस, शरीराच्या मानाने थोडे मोठे डोके व खांदे आणि १७० किग्रॅ. च्या आसपास वजन असे ह्या जातीतील डुकरांचे ढोबळ वर्णन आहे.

यांशिवाय परदेशातील सुधारित जातीच्या डुकरांची आयात करून त्यांचा स्थानिक जातीच्या डुकरांशी संकर करून सुधारित जाती पैदा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. याकरिता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड या देशांतून मध्यम पांढरे यॉर्कशर, बर्कशर, हँपशर आणि लँड्रेस या जातींच्या डुकरांची आयात करण्यात आली आहे. आनुवंशिकीतील तत्त्वांच्या आधारे प्रजननातील विविध पद्धतींचा अवलंब करून ह्या संकरित जाती तयार करण्यात येत आहेत. या प्रकारचे प्रयत्न उत्तर प्रदेशातील आग्रा, मीरत, इटा, मेनपुरी, फरुखाबाद, मुझफरनगर या जिल्ह्यांतून तसेच पंजाब व दिल्ली या राज्यांतूनही चालू आहेत.

प्रजनन : अनेक वर्षांपासून हा प्राणी माणसाळलेला असला, तरी अठरा-एकोणिसाव्या शतकापर्यंत त्याच्या प्रजननाकडे फारसे लक्ष कुठेच दिले गेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या विशुद्ध जातीही तोपर्यंत अस्तित्वात नव्हत्या. डेन्मार्कमध्ये प्रथमतः डुकरांच्या निर्वर्तन कसोट्यांच्या (त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दृष्टीने घेण्यात येणाऱ्या कसोट्यांच्या) नोंदी ठेवण्याची पद्धत सुरू झाली. हेच कार्य अमेरिकेत १९२६ मध्ये, तर कॅनडात १९२८ मध्ये सुरू झाले. दोन विशुद्ध जातींचा संकर केला असताना आनुवंशिकीतील तत्त्वाप्रमाणे संकरित प्रजेमध्ये संकरज ओज (गुणवत्ता सुधारण्याची क्षमता) निर्माण होतो व त्या प्रमाणात कार्यक्षमता वाढते. सर्वसाधारणपणे ह्याच पद्धतीने प्रजनन करून डुकरांच्या जातींची कार्यक्षमता वाढविली गेली आणि मांसोत्पादन, चरबी, एका वेतात होणाऱ्या पिलांची संख्या वगैरे बाबींचा समन्वय साधून नवीन जाती निर्माण झाल्या. त्याबरोबरच खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता विचारात घेऊन मिनेसोटा विद्यापीठात मिनेसोटा क्र. १ व क्र. २ व इतरत्र मेरीलँड, माँटॅना, पालाऊ इ. जाती निर्माण करण्यात आल्या. त्या त्या जातीची वैशिष्ट्ये ठरविण्याबाबत काटेकोर नियम करणाऱ्या प्रातिनिधिक संस्था नोंदल्या गेल्या व अशा रीतीने डुकरांची व्यापारी पद्धतीने पैदास सुरू होऊन या धंद्याला स्थैर्य प्राप्त झाले. कमी खाऊन थोड्या अवधीत जास्तीत जास्त मांस किंवा चरबी अगर दोन्हीही देणाऱ्या अनेक जाती आज अस्तित्वात आहेत.

डुकरांचे प्रजनन ज्या वेळी धंदा म्हणून केले जाते त्यावेळी डुकराच्या जातीची निवड करताना एका वेतात होणाऱ्या पिलांची संख्या, मादीच्या स्तनांची संख्या, तिचे दूध, खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता इ. बाबींमध्ये सरस असणाऱ्या जाती निवडतात. सर्वसाधारणपणे मादीला एकाच वेळी ८ ते १४ पिले होतात व वर्षातून दोन वेते होतात. माद्या सहा महिन्यांच्या झाल्यावर माजावर येतात, परंतु ८ ते ८/महिन्यांच्या झाल्यावरच त्यांचा नराशी संयोग करतात. माज तीन दिवस टिकतो. दुसऱ्या अगर तिसऱ्या दिवशी नराशी संयोग करतात. गाभण न झाल्यास पुन्हा तीन आठवड्यांनी मादी माजावर येते. गर्भधारणेचा काल ११२ ते ११६ दिवसांचा असतो. पिले सात ते बारा आठवड्यांपर्यंत आईचे दूध पितात, तरी तीन आठवड्यांनंतर त्यांना दुधाबरोबर थोडे थोडे खाद्य देण्यास सुरुवात करतात. पिलांचे स्तनपान बंद झाल्यावर बहुधा तिसऱ्या किंवा चौथ्या परंतु खात्रीने दहा दिवसांत मादी पुन्हा माजावर येते. अशा रीतीने प्रजनन चक्र २४ ते २८ आठवड्यांत पूर्ण होते. त्यामुळे काटेकोर व्यवस्थापनाने एका वर्षात दोन वेते पूर्ण होऊ शकतात. सर्वसाधारणपणे माद्या ५ ते ६ वर्षे परंतु कित्येक चांगल्या जातींच्या माद्या १० ते १२ वर्षे प्रजननासाठी उपयोगात आणतात.

जोपासना व आहार : अगदी उघड्यावर किंवा एकदम बंदिस्त घरामधून डुकरे वाढविण्यापेक्षा दोनही प्रकारच्या सोयी मिळतील अशी व्यवस्था जास्त उपयुक्त ठरते. यासाठी ‘डच प्रकारची घरे’ उपयुक्त आहेत. या घरामध्ये मध्यभागी मोठा गाळा असून त्याच्या दोन्ही बाजूंना मादी पिले घेऊन राहू शकेल असे छोटे गाळे असतात. या गाळ्याची लांबी ३·७ मी. व रुंदी २·५ मी. असते. या गाळ्यांना जोडून गाळ्याइतकीच मोकळी जागा असते. पाहिजे तेव्हा मादी आत बाहेर करू शकते. कल्पकता योजून अनेक प्रकारची लाकडी किंवा सिमेंटची छेटी घरे बांधण्यात आली आहेत. सर्वसाधारणपणे सिमेंटची जमीन, योग्य उतार असलेली गटारे, खेळती हवा राहील अशी या घरांची रचना असते. विण्याच्या खोल्या स्वतंत्र असतात व त्यांत मादीच्या अंगाखाली पिले चिरडली न जातील अशी व्यवस्था करतात. चारापाणी ठेवण्यासाठी गव्हाणीची व्यवस्था असणे जरूर असते. सु. एक मी. व्यासाचे सिमेंटचे मोठे नळ अर्ध्यावर कापून उपडे करून त्यांना पाय लावून योग्य उंचीवर पक्के बसविले, तर त्यांचा डुकरांना गव्हाणीसारखा चांगला उपयोग होतो. डुक्कर हा सर्वभक्षक प्राणी असून निरनिराळ्या खाद्यपदार्थांचे इतकेच नव्हे, तर वाया जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे जलद गतीने मांसात रूपांतर उपयुक्त प्राणी आहे. त्याचे पोट इतर जनावरांच्या मानाने लहान असल्यामुळे त्याचे खाद्य सांद्रित (थोड्या खाद्यात पुष्कळ सत्त्व असलेले) असावे लागते. त्यात प्रथिने, पिष्टमय घटक, खनिजे व लवणे यांचा समावेश असणे जरूर असते. आठ ते दहा आठवड्यांनी डुकरे तीन किग्रॅ. खाद्य खाल्ल्यावर आपले वजन एक किग्रॅ. वाढवू शकतात. पुढे वाढत्या वयाबरोबर मात्र १ किग्रॅ. वजन वाढवावयास चार किंवा पाच किग्रॅ. खाद्य लागते. यूरोप व अमेरिकेत मका, जव, गहू व त्यांचा कोंडा, अळशी इ. धान्ये व माशांची भुकटी, मलई काढलेले दूध, मनुष्यास निरुपयोगी झालेले मांस, रक्ताची भुकटी, सोयाबीन इ. पदार्थांचा वापर करून डुकरांसाठी संतुलित खाद्यमिश्रणे तयार करण्यात आली आहेत. यांशिवाय बटाटे, रताळी, हिरवा चारा व हॉटेलमधील उष्टे-खरकटे यांचा डुकराच्या खाद्यात समावेश असतो. प्रामुख्याने कॅल्शियम व फॉस्फरस यांची लवणे, लोह व तांबे यांची खनिजे अ, ड आणि ब ही जीवनसत्त्वे डुकरांच्या खाद्यात असणे जरूरीचे आहे.


भारतामध्ये मका, गहू किंवा तांदळाचा कोंडा, शेंगदाण्याची पेंड व कडधान्ये वापरून डुकरांची खाद्यमिश्रणे अलीकडे तयार होऊ लागली आहेत. ही मिश्रणे तयार करताना त्यांतील खाद्यपदार्थांचे प्रमाण हे खाद्यातील अन्नघटक व ज्या कारणाकरिता डुकरे वाढविली जात असतील त्यांवर अवलंबून असते. वाढत्या वयाच्या डुकरांना द्यावयाच्या मिश्रणात प्रथिने व पिष्टमय पदार्थ यांचे प्रमाण १ : ४ असते, तर हेच प्रमाण हळूहळू बदलत जाऊन पूर्ण वाढ झालेल्या डुकरांच्या खाद्यात १ : ७ पर्यंत वाढत जाते. खाद्यमिश्रणाचे रोज द्यावयाचे प्रमाण ढोबळ मानाने दर महिना वयास ४५० किग्रॅ. असे असते. पिले एक महिन्याची झाली म्हणजे मादीला प्रत्येक पिणाऱ्या पिलामागे ४५० किग्रॅ मिश्रण देतात. प्रजननासाठी पाळलेल्या डुकरांपेक्षा गलेलठ्ठ करण्यासाठी पाळलेल्या डुकरांना ५० टक्के खाद्य अधिक देतात. नमुन्यादाखल अशा खाद्यमिश्रणाचे खाद्यघटक पुढे दिले आहेत. मका २८ किग्रॅ., जव किंवा गहू १४ किग्रॅ., माशाची भुकटी ४·५ किग्रॅ. यांशिवाय कोबी, बटाटे, बीट व आल्फाआल्फा, नेपियर यांसारखा हिरवा चारा डुकरांना घालतात.

उपयुक्तता : डुकरांचा उपयोग प्रामुख्याने मांसोत्पादनासाठी होत असला तरी चरबी, चामडी, केस, रक्त, खूर इ. अनेक उपपदार्थ मिळतात. डुकराच्या मांसाला पोर्क म्हणतात. पाठीवरील मांस बेकन म्हणून प्रसिद्ध आहे, पुठ्ठ्यावरील व मागच्या तंगडीवरील मांसाला हॅम म्हणतात. मांस व त्याचे वरील प्रकार तयार करण्यासाठी भारतात सरकारी व खाजगी क्षेत्रांत काही कारखाने काढण्यात आले आहेत व त्यांत १९६६–६७ सालात ३४,००० टन मांसोत्पादन झाले. अलीकडे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या साहाय्याने अलीगढ, हरिंघाट (प. बंगाल), मुंबई व गनावरन (आंध्र प्रदेश) येथे मोठ्या प्रमाणावर डुकरांची प्रजनन केंद्रे व बेकनचे कारखाने काढण्यात आले आहेत.

डुकराच्या केसाइतकी किंमत दुसऱ्या कुठल्याही पाळीव जनावराच्या केसांना येत नाही. सामान्यपणे मान व पाठ यांवरील केस वापरले जातात. केस मुळापासून टोकाकडे निमुळते होत जाऊन टोके चिरलेली असतात, त्यामुळे ते रंगाचे ब्रश करण्यासाठी उपयुक्त असतात. भारतातून प्रती वर्षी २५ कोटी रुपये किंमतीच्या केसांची निर्यात होते. लार्ड (खाण्याचे तेल), वंगण तेल, मेणबत्त्या, साबण व इतर कित्येक उद्योगधंद्यांमध्ये चरबी वापरली जाते. काही ग्रंथींचा औषधासाठी, तर खुरांचा औद्योगिक तेल करण्यासाठी उपयोग होतो.

 रोग : इतर पाळीव प्राण्यांप्रमाणे डुकरांना जंतुजन्य, व्हायरसजन्य, कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींपासून उद्‌भवणारे), त्याचप्रमाणे जीवोपजीवींमुळे (दुसऱ्या जीवांच्या शरीरावर उपजीविका करणाऱ्या जीवांमुळे) रोग होतात. यांशिवाय खाद्यातील विशिष्ट घटकांच्या न्यूनतेमुळेही काही विकार उद्‌भवतात. यांतील महत्त्वाच्या रोगांची माहिती येथे थोडक्यात दिली आहे.

 प्लेग : पाश्चुरेला मल्टोसिडा या जंतूमुळे होणारा हा संक्रमक (सांसर्गिक) रोग आहे. डुकरांच्या श्वसन तंत्रामध्ये हे जंतु नेहमी आढळतात, परंतु इतर कारणांनी डुकरांना अशक्तपणा आला म्हणजेच त्यांचा जोर होऊन रोग उद्‌भवतो. उच्च ताप, भूक न लागणे, कष्टप्रद श्वासोच्छ्‌वास, कधीकधी गळ्यावर शोफ (द्रवयुक्त सूज) ही लक्षणे दिसतात. तीव्र स्वरूपाचा फुप्फुसशोथ (फुप्फुसाची दाहयुक्त सूज) आणि विषरक्तता (रक्तामध्ये मोठ्या प्रमाणावर विष भिनणे) होऊन मृत्यू ओढवतो. डुकरांच्या पिलांमध्ये रोग उद्‌भवल्यास तो अतितीव्र स्वरूपात होऊन तासांच्या आत पिले मरतात. आजारी डुकरांना रोगाविरुद्धचा रक्तरस टोचतात. पेनिसिलिनासारखी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे टोचली असता आजारी डुकरे बरी होतात. प्रतिबंधक उपाय म्हणून रोगावरील लस टोचतात.

धावरे : एरिसिपेलोथ्रिक्स हुसिओपथी या जंतूमुळे प्रामुख्याने डुकरांत होणारा हा संसर्गजन्य रोग आहे. डुकराव्यतिरिक्त मेंढ्या, उंदीर, टर्की व माणसे यांनाही ह्या जंतूमुळे रोग होऊ शकतो. रोगजंतूंचा प्रसार रोगी डुकरांच्या विष्ठेतून, तसेच उंदीर व पक्ष्यांकडून होत असतो. रोगाने मेलेले उंदीर खाल्ल्यामुळे डुकरांत रोग झालेला आढळला आहे. रोगलक्षणे रोगाच्या तीव्र व चिरकारी (बराच काळ रेंगाळणाऱ्या) प्रकारावर अवलंबून असतात.

तीव्र प्रकारमध्ये जंतुरक्तता (रक्तामध्ये जंतू आढळणे) हे प्रमुख लक्षण आहे. भूक मंदावणे, ४१° ते ४२° से. पर्यंत ताप चढणे, सांधेदुखीमुळे बसण्या-उठण्याला त्रास होणे, कष्टप्रद श्वासोच्छ्‌वास, प्रथम बद्धकोष्ठ व नंतर अतिसार ही लक्षणे दिसतात. क्रमाने कानामागे, मांड्यांच्या आतील बाजूस, कोपराखाली व शेवटी सर्वांगावरील कातडे लाल होते. पत्त्यातील चौकटच्या आकाराचे अनेक चट्टे कातड्यावर उठून दिसू लागतात. चट्ट्याचे कातडे राठ व काळे दिसू लागते किंवा क्वचित गळून पडते. पुढे जंतुरक्तता वाढून ५ ते १० दिवसांत मृत्यू ओढवतो.

चिरकारी प्रकारात सांधेदुखी हे मुख्य लक्षण दिसते. रोग दोन ते तीन महिने रेंगाळत राहतो. कोपर, ढोपर, गुडघा आणि घोट्याचे सांधे ग्रस्त झाल्यामुळे डुक्कर लंगडत चालते. सांध्यांना सूज येऊन ते हाताला गरम लागतात. पुढेपुढे सांधे ताठर होऊन संधिग्रह (सांध्यांची हालचाल बंद होणे ) होतो. हृदंतस्तरशोथ (हृदयाच्या अस्तराची सूज) हेही चिरकारी प्रकारातील लक्षण असते. सूज आलेल्या जागी केशवाहिन्या (सूक्ष्म रक्तवाहिन्या) फुटून नीलत्वचीय ठिपके (रक्त आल्यामुळे झालेल्या ठिपक्याएवढ्या जखमा) दिसू लागतात. त्या जागी तसेच हृदयाच्या झडपांवर फुलकोबीसारख्या दिसणाऱ्या कोशिकांची (पेशींची) वाढ होते. थकवा येणे, श्वासोच्छ्‌वासास त्रास होणे, कुत्र्यासारखे छातीवर पडून राहणे इ. लक्षणे दिसतात. फुप्फुसशोथ व रुधिर परिवहनात अडथळा उत्पन्न होऊन आकस्मिक मृत्यूही ओढवतो.

आजारी डुकरांना पेनिसिलिनासारखी प्रतिजैव औषधे किंवा धावरे रोगाविरुद्ध रक्तरस टोचला असता ती बरी होतात. रोगप्रतिबंधक उपाय म्हणून रोगावरील लस दर वर्षी टोचतात.

ब्रसेलोसिस : ब्रूसेला ॲबॉर्टस सुइस या सूक्ष्मजंतूमुळे डुकरांमध्ये विशेषतः माद्यांमध्ये होणारा हा संसर्गजन्य रोग आहे. मनुष्यामध्येही यामुळे ⇨ आंदोलज्वरहोण्याची भीती असल्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही हा रोग महत्त्वाचा आहे. खाटीकखान्यात काम करणारे कर्मचारी, पशुवैद्य आणि डुकरे पाळणारे यांना ही भीती जास्त प्रमाणात असते. रोगी माद्यांमध्ये गर्भपात, वंध्यत्व तसेच त्यांनी जन्म दिलेल्या पिलांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू यांमध्ये या रोगाला आर्थिक महत्त्व प्राप्त झाले आहे. रोगी मादीच्या गर्भपातानंतर जननेंद्रियातून होणाऱ्या स्त्रावातील जंतूंमुळे दूषित झालेले अन्नपाणी व इतर वस्तू, तसेच रोगी नराशी अगर मादीशी संयोग यांमुळे रोगप्रसार होतो. नरामध्ये वृषणाला (शुक्राणू निर्माण करणाऱ्या ग्रंथीला) सूज येते व तेथील ऊतकाचा (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाचा) मृत्यू होऊन नपुंसकत्व येते. कळपातील सर्व डुकरांच्या रक्ताची समूहन परीक्षा (रक्तरसातील प्रतिपिंडांची म्हणजे जंतूंना विरोध करण्यासाठी तयार झालेल्या पदार्थांची विशिष्ट प्रक्रियात्मक परीक्षा) करून रोगसंपर्क झालेली डुकरे ओळखता येतात. अशी डुकरे मारून रोगनियंत्रण करतात. रोगावर काहीही खात्रीलायक उपाय नसल्यामुळे कळप रोगमुक्त करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.


लेप्टोस्पायरोसिस : लेप्टोस्पायरा इक्टेरोहॅमरेजिका व ले. कॅनिकोला या प्रोटोझोआंमुळे (आदिजीवांमुळे) डुकरांमध्ये हा संसर्गजन्य रोग होतो. कावीळ, गर्भपात व वंध्यत्व ही लक्षणे यात दिसतात. गर्भपात संपूर्ण दिवस भरण्याआधी २ ते ४ आठवडे होतो. रोगातून बऱ्या झालेल्या डुकरांच्या मूत्रात रोगकारक प्रोटोझोआ कित्येक महिने आढळून येतात. बहुधा अशा मूत्रामुळे दूषित झालेले अन्नपाणी व इतर वस्तूंच्या संपर्काने रोगप्रसार होतो. सूक्ष्मदर्शकाने मूत्राची तपासणी केल्यास त्यात रोगकारक प्रोटोझोआ आढळून येतात. तसेच कळपातील डुकरांच्या रक्ताच्या समूहन परीक्षेने रोगग्रस्त डुकरे ओळखता येतात. प्रतिजैव औषधे टोचली असता रोग बरा होतो. प्रतिबंधक उपाय म्हणून रोगाविरुद्धची लस टोचतात.

स्वाइन फीव्हर : व्हायरसामुळे होणारा हा एक संहारक रोग आहे. अमेरिकेत हा हॉग कॉलरा या नावाने ओळखला जातो. रानटी व पाळीव दोन्ही तऱ्हेच्या डुकरांना हा रोग होतो. डुकरे पाळणाऱ्या लोकांचे सर्वांत जास्त आर्थिक नुकसान ह्या रोगाच्या साथीमुळे होते व जगातील सर्व देशांत हा आढळतो. आजारी डुकराच्या सर्व उत्सर्गात व स्त्रावांत रोगकारक व्हायरस आढळतो. आजारी डुकराच्या मलमूत्रामधील, तसेच स्वयंपाकघरातील दूषित अर्धेकच्चे डुकराचे मांस असलेल्या उष्ट्याखरकट्यातील व्हायरसामुळे रोगप्रसार होतो. रोगाचा परिपाक काल (रोगाचा व्हायरस शरीरात शिरल्यापासून रोग लक्षणे दिसेपर्यंतचा काळ) सर्वसाधारणपणे ५ ते १० दिवसांचा असतो. कधीकधी हा ३० दिवसापर्यंत असू शकतो. या अवधीत मारल्या गेलेल्या डुकरांच्या मांसात रोगाचे व्हायरस १७ दिवस, तर गोठविलेल्या मांसात ४ वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. डुकरांच्या पिलांमध्ये हा रोग तीव्र स्वरुपात होतो व त्यांत मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असते. तीव्र प्रकारात ४० ते ४१ से. पर्यंत ताप, भूक न लागणे, अंगाखालच्या गवतात दडून बसणे, ढोसून हालवले तरी थोडे चालून पुन्हा तसेच बसणे, कष्टप्रद श्वासोच्छ्‌वास, कधी खोकल्याची ढास, घाण येणारे विटकरी रंगाचे जुलाब, ओकणे इ. लक्षणे दिसतात. लक्षणे दिसू लागल्यावर ३ ते ४ दिवसांत मृत्यू ओढवतो. वयस्क डुकरातही तीव्र प्रकारचा रोग होतो, पण तो आठवडा दोन आठवडे रेंगाळत राहतो. दुसऱ्या प्रकारात ताप, चालताना लटपटणे, ओचके येणे, अंग थरथरणे, आंधळेपणामुळे अडखळणे इ. लक्षणे दिसून मृत्यूही लवकर ओढवतो. मृत्यूचे प्रमाण कधीकधी १०० टक्के राहते.

चिरकारी प्रकारामध्येही वरील लक्षणे आढळतात, पण रोग बरेच आठवडे रेंगाळतो.

मृत्यूचे प्रमाण, वरील लक्षणे व आतड्यातील अस्तरावर दिसणारे बटणाच्या आकाराचे चट्टे यांवरून रोगनिदान करतात. 

 आजारी डुकरांची ताबडतोब दखल घेऊन त्यांना रोगाविरुद्धचा रक्तरस टोचतात. रोगप्रतिबंधनाकरिता विविध प्रकारांनी बनविलेल्या लसी उपलब्ध आहेत. त्यांत काही क्षीणन (व्हायरसांची रोगकारक शक्ती कमी केलेल्या) लसींचाही अंतर्भाव आहे. अमेरिकेत अशा अनेक लसी उपलब्ध आहेत. मारलेल्या व्हायरसांपासून केलेल्या लसी भारतात वापरात आहेत.

देवी : इतर जनावरांप्रमाणे डुकरांनाही व्हायरसामुळे देवी हा रोग होतो. उच्च ताप, भूक न लागणे, कातड्यावर देवीचे फोड येणे इ. लक्षणे दिसतात. हा रोग कमी प्रमाणात आढळतो. लक्षणात्मक उपचार करतात. प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्यामुळे आजारी डुकरांना कळपातून बाजूस काढून मारून टाकणे हाच साथीला आळा घालण्याचा उपाय आहे. 

 इन्फ्ल्यूएंझा : डुकरांच्या पिलांमध्ये दिसून येणारा व व्हायरसामुळे होणारा हा एक संसर्गजन्य रोग आहे. रोगी पिलांना जेव्हा हीमोफायलस इन्फ्ल्यूएंझी सुइसया जंतूंचा संपर्क होतो, त्या वेळी रोगाची तीव्रका अधिक असते. ताप, नकाडोळ्यांवाटे पातळ उत्सर्ग (बाहेर पडणारा स्त्राव), फुप्फुसशोथ परिफुप्फुसशोथ (फुप्फुसावरील आवरणाची दाहयुक्त सूज), सांध्यांची सूज इ. लक्षणे दिसतात. सोल्यूसेप्टाझाइन व सल्फामेथाझाइन ही औषधे उपयुक्त आहेत. 

नाळीचा रोग : (नेव्हल इलनेस). नवीन जन्मलेल्या डुकरांच्या पिलांच्या नाळेतून एश्चेरिकीया कोलाय या जंतूचा संपर्क होऊन हा संसर्गजन्य रोग होतो. नाळेवाटे रोगजंतू यकृत व निरनिराळ्या सांध्यापर्यंत पोहोचतात आणि कावीळ व सांधेदुखी ही लक्षणे दिसतात. माद्या ज्या खोल्यांमध्ये वितात त्यांमध्ये स्वच्छता राखणे हे रोग नियंत्रणाचे सूत्र आहे. सल्फानिलामाइड हे औषध दिल्याने पिले बरी होतात.

कवकजन्य रोग : ॲक्टिनोमायसीस स्ट्रेप्टोथ्रिक्स ह्या कवकामुळे डुकरांच्या माद्यांत कासेमध्ये गाठी तयार होतात. या गाठी एका किंवा अनेक स्तनांमध्ये होतात. रोग वाढत गेला म्हणजे पोट व आंतड्यांतही या गाठी होतात व पचन तंत्रात बिघाड उत्पन्न होऊन बद्धकोष्ठता किंवा अतिसार ही लक्षणे दिसतात. सल्फापिरिडीन व कलिल आयोडीन ही औषधे देतात. तसेच शस्त्रक्रिया करून गाठी कापून काढतात.

 जीवोपजीवीजन्य आजार : घाणेरड्या जागेत राहणाऱ्या व उकिरड्यावरील घाणकचरा खाणाऱ्या डुकरांमध्ये गोलकृमी व यकृत पर्णकृमींमुळे रोगराई होते. ॲस्कॅरिस लंब्रिकॉइडिस व मॅक्रॅकँथोऱ्हिंकस हिरुडिनेशियस हे दोन गोलकृमी महत्त्वाचे आहेत. वाढ खुंटणे, मलूल होणे, अतिसार, अशक्त होत जाणे इ. लक्षणे कृमिपीडित डुकरांत दिसतात. चिनोपोडियम तेल हे गुणकारी जंतनाशक औषध देतात. फॅसिओला जायगँटिका या यकृत पर्णकृमीमुळे अतासार, रक्तक्षय इ. लक्षणे दिसतात. कार्बन टेट्राक्लोराइड किंवा हेक्झॅक्लोरेथीन ही औषधे गुणकारी आहेत.


ट्रिकिनेला स्पयरॅलिस या छोट्या गोलकृमीमुळे डुक्कर, माणूस, कुत्रे यांच्यामध्ये तसेच दुसऱ्या अनेक मांसाहारी प्राण्यांमध्ये ऊतकक्रामी संसर्ग होतो. ह्या कृमीची अळी अवस्था आतड्यामधून स्थानांतर करून रक्तवाहिन्यांमार्फत स्नायूंमध्ये प्रवेश मिळविते. तिथे त्या अळ्या पुटीमय (भोवताली कवच असलेल्या) अवस्थेत राहतात. डुकरांना अर्धकच्चे मांस अगर दूषित उंदीर खाण्यामुळे ह्या कृमीचा संपर्क होतो. वुलवरहँप्टर (ब्रिटन) येथे १९४१ मध्ये माणसांत ह्या रोगाची साथ आली होती. त्या वेळी ५०० रोगी आढळले. उंदरामुळे डुकरात व डुकरांमुळे माणसात हा रोग त्या वेळी पसरला. दूषित मांस खाण्यात न येऊ देणे हाच प्रतिबंधक उपाय आहे.

डुकरांना फीतकृमीमुळे बहुधा संसर्ग पोहोचत नाही परंतु टिनीया सोलियम ह्या मनुष्यातील फीतकृमीची अळी अवस्था डुकरांच्या मांसात आढळते. त्यामुळे डुकराचे अर्धकच्चे शिजविलेले मांस खाऊन माणसांना ह्या फीतकृमीचा उपद्रव होतो.

न्यूनताजन्य रोग : खाद्यपदार्थांतील काही घटकांच्या न्यूनतेमुळे इतर प्राण्यांप्रमाणे डुकरांमध्येही आजार उद्‌भवतात. खनिजांच्या न्यूनतेमुळे होणारे आजार इतर कुठल्याही जनावरांपेक्षा डुकरात जास्त प्रमाणात होतात. डुकरांच्या पिलांत होणारा रक्तक्षय लोह व तांबे यांच्या न्यूनतेमुळे होतो. हृदयाचे ठोके वाढणे, कातडी फिकी पडणे इ. लक्षणे दिसतात. मृत्यूचे प्रमाण बरेच असते. रक्तशर्करान्यूनता (रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे) हा जन्मल्यानंतर ४८ तासांत डुकरांच्या पिलांत होणारा एक आजार आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण दर १०० ग्रॅमला ५० मिग्रॅ.वरून २० मिग्रॅ. पर्यंत कमी झाले की, रोगलक्षणे दिसू लागतात. मातेच्या दुधाचा अभाव हे त्याचे मुख्य कारण आहे. कॅल्शियम, फॉस्फरस आणि ई जीवनसत्त्व यांच्या न्यूनतेमुळे डुकराच्या पिलांत ‘मुडदूस’ हा आजार होतो, तर कॅल्शियमाच्या न्यूनतेमुळे दुग्धज्वर हा आजार डुकरांच्या माद्यांमध्ये होतो व यात बेशुद्धी, मागील पायांचा पक्षाघात अशी लक्षणे दिसतात. मादी व्याल्याबरोबर हा ज्वर येत असल्यामुळे याला ‘बाळंतज्वर’ असेही नाव आहे. डुकराच्या नवजात पिलामध्ये आयोडीन न्यूनतेमुळे केस वाढणे थांबते. ज्या खाद्य घटकांच्या न्यूनतेमुळे आजार उद्‌भवलेले असतील ते अन्नघटक खाद्यातून पुरविणे तसेच पिलामध्ये अन्नघटकांच्या न्यूनतेमुळे रोग उद्‌भवू नयेत म्हणून गरोदरपणीच मादीला ते योग्य प्रमाणात पुरविणे, हे रोगनियंत्रणाचे उपाय आहेत.

यांव्यतिरिक्त जीवनसत्त्वे अ, ब, ड आणि ई यांच्या न्यूनतेमुळे वाढ खुंटणे, काही डोळ्यांचे व कातडीचे विकार इ. आजार संभवतात. त्या त्या जीवनसत्त्वाच्या पुरवठ्यामुळे हे आजार बरे होतात.

खरूज : डुकरांना होणाऱ्या त्वचेच्या रोगांमध्ये सॉरकॉप्टिस स्कॅबीई यामुळे होणारी खरूज हा एक महत्त्वाचा रोग आहे. हे रोगकारक जीवोपजीवी त्वचेमध्ये खोलवर शिरून तिथेच अंडी घालतात. त्यांचे जीवनचक्र दोन ते तीन आठवड्यांत पूर्ण होते. खाज फार सुटत असल्यामुळे अंग घासून डुक्कर हैराण होऊन जाते व आजारून अशक्त होते. सर्वांगाला क्रूड पेट्रोलियम किंवा गंधकाचे मलम लावल्याने हा त्वचा रोग बरा होतो.

 यांशिवाय काळपुळी (सांसर्गिक), लाळरोग व क्षयरोग या डुकरांना होणाऱ्या रोगांची माहिती या रोगांच्या नावाच्या शीर्षकाखाली पहावी.

संदर्भ :

1. Blood, D. C. Henderson, J. A. Veterinary Medicine, London, 1973.

2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1970.

3. I. C. A. R. Handbook of Animal Husbandry, New Delhi, 1967.

4. Miller, W. C. West, G. P., Eds. Black’s Veterinary Dictionary, London, 1962.

 

फडके, श्री. पु. दीक्षित, श्री. गं. देवधर, ना.शं.

Comments

Popular posts from this blog

Chakras And Its Seven Types | How To Activate Chakras In The Human Body

दशरथ-जातक

नाग ,पंच शील ,बुद्ध , और नागपंचमी की सच्चाई।