प्राचीन तीर्थंकर परंपरा आणि महावीर
प्राचीन तीर्थंकर परंपरा आणि महावीर
मध्यमपावाची धर्मपरिषदेत कैवल्याज्ञानी भगवान महावीरांनी पारंपरिक वैदिक धर्माला आव्हान दिले. अकारा वैदिक पंडित आणि त्यांच्या ४४०० शिष्यांनी त्यांच्याकडून प्रव्रज्या स्वीकारली. ही घटना जैन परंपरेचा एक संस्थात्मक धर्म म्हणून उद्घोषच होता. मात्र जैन साहित्य व इतिहास यांचे अवलोकन केले असता,महावीरांच्या फार पूर्वीपासून जैन परंपरा अस्तित्वात होती. अशी मांडणी सातत्याने जैन अभ्यासकांनी आणि तशीच काही विदेशी अभ्यासकांनी केली आहे. जैन परंपरा आपल्या अतिप्राचीनत्वाचा जो दावा करते. त्याच्यासाठी या परंपरेने दिलेल्या प्रमाणांचा आढावा घेणे आवश्यक ठरते. महावीरांना जैन धर्माचे २४ वे आणि अखेरचे तीर्थंकर मानले जाते. तीर्थंकर ही संकल्पना यासाठी पाहावी लागते. जैन धर्माच्या ऐतिहासिक धारणेप्रमाणे कालचकाचे दोन भाग करण्यात आले आहे. पहिला म्हणजे क्रमशः विकसित होत जाणारा म्हणजेच उत्सर्पिणी काल आणि दुसरा म्हणजे क्रमशः -हास होत जाणारा म्हणजेच अवसर्पिणी काल. कालचक रथाच्या चाकाप्रमाणे खालून वर आणि वरून खाली म्हणजेच अवनतीकडून उन्नतीकडे आणि उन्नतीकडून अवनतीकडे फिरत असते. सहा अवसर्पिणी व सहा उत्सर्पिणी मिळून एकूण बारा दात्यांचे एक कालचक्र पूर्ण होते. जैन परंपरेनुसार सध्या आपण अवसर्पिणी काळातून मार्गकमण करत आहोत. म्हणजेच प्रत्येक अपसर्पिणी कालात २४ व उत्सर्पिणी कालात २४ तीर्थंकर होत असतात. सध्याच्या अपसर्पिणी कालात २४ तीर्थंकर झालेत. त्यातीलच भगवान महावीर हे चोवीसावे तीर्थंकर. तीर्थंकर संकल्पनेला अत्यंत व्यापक अर्थ आहे. सामान्यतः तीर्थ म्हणजे पवित्र स्थान. परंतु त्याचा मूळ अर्थ नदीवरील घाट असा होतो. अतिप्राचीन काळापासून सिंधू,गंगा,गोदावरी,नर्मदा,ब्रहमपुत्रा आदि नद्यांच्या नावावरुनच भारतीय उपखंडातील विविध संस्कृती जगाला परिचित आहेत. त्यामुळे सर्व पवित्र नद्यांच्या काठावरच तीर्थस्थळं असलेली दिसतात. नदीवरील घाट म्हणजेच तीर्थ हे असे ठिकाण असते की, जेथून नदीच्या पैलतीरावर जाण्याची साधनं उपलब्ध असतात. या साधनांचा चालक म्हणजे नावाडी हाच खरा त्या घाटाचा किंवा तीर्थाचा स्वामी,अधिकारी,कर्ता,मालक इत्यादी असतो. रुपकाच्या भाषेत सांगायचे झाल्यास,जग म्हणजे नदी ज्याला भवसागर ही म्हणता येते. धर्म किंवा सत्य हा तिचा घाट किंवा तीर्थ. सत्य जाणलेला आणि पैलतीर पाहिलेला नावाडी म्हणजे तीर्थंकर. नदी पार करुन गेलेला हा नावाडी तसा मोक्षाला प्राप्त झालेला असतो. असे असले तरी, तो क्षणमात्र ही विश्रांती न घेता पार येऊ इच्छिणा-यांना पैल तीरावर नेण्याच्या,मार्गदर्शन करण्याच्या कामात मग्न असतो. अधिकाधिक लोकांना नदी पार करुन आपल्या मुक्कामावर म्हणजे मोक्षापर्यंत पोहचता यावे यास्तव अथक परिश्रम करतो. जैन धर्माच्या परिभाषेत तीर्थ ही संकल्पना 'धर्मसंघ' अशा अर्थाने देखील वापरल्या जाते. धर्मसंघ साधू,साध्वी,श्रावक व श्राविका अशा चार प्रकारांचे असतात. धर्मसंघांची स्थापना करणारा तो तीर्थंकर असाही अर्थही येथे गृहित आहे. ऋषभदेव,अजितनाथ,संभवनाथ,अभिनंदन,सुमतिनाथ,पद्मप्रभ,सुपार्श्वनाथ,चंद्रप्रभ,सुविधिनाथ,शीतलनाथ,श्रेयांसनाथ,वासुपूज्य,विमलनाथ,अनंतनाथ,धर्मनाथ,शांतिनाथ,कुंथुनाथ,अरनाथ,मल्लिनाथ,मुनिसुव्रत,नमिनाथ,अरिष्टनेमि,पार्श्वनाथ,वर्धमान महावीर असे चोवीस तीर्थंकर जैन परंपरेत मानण्यात आले आहेत, या चोवीस तीर्थंकरांपैकी भगवान पार्श्वनाथ आणि भगवान महावरी हेच इतिहासकारांच्या मते प्रत्यक्षात होऊन गेले. त्यांची ऐतिहासिकता विविध ग्रंथ व पुरावे यांनी सिद्ध झाली आहे. भगवान अरिष्टनेमींच्या संदर्भात काही प्रमाणात ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. उर्वरित एकवीस तीर्थंकरांची जीवनगाथा आजही पौरणिक स्वरूपाची मानली जाते. ऋषभदेवांचा संदर्भ ऋगवेद,महाभारत व भागवतात असल्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न काही अभ्यासकांनी केला आहे. बौद्ध आणि जैन धर्म हे वैदिक धर्माचाच भाग आहे,असे सिद्ध करण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात आला. मात्र हे संपूर्णपणे अमान्य करण्याइतके पुरावे बौद्ध व जैन धर्माच्या विविध अभ्यासकांनी संकलित केले. पुराव्यांचा नेमका अन्वयार्थ लावून हे दोन स्वतंत्र व अनार्य-अवैदिक धर्म आहेत. हे काटेकोरपणे सिद्ध केले आहे. याठिकाणी आपल्याला केवळ जैन धर्माचा विचार करावयाचा आहे. भगवान बुद्ध असो वा भगवान महावीर असोत हे दोघे ही क्षत्रिय होते. हा आरंभबिंदू मानल्यास त्यांच्या मागे असलेल्या एका समृध्द अनार्य व अवैदिक परंपरेचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रवाह संशोधकांनी शोधलेला दिसतो. आर्येतर लोकांच्या आध्यात्म विषयक व संस्कृतीमूलक विचरांचे पर्यवसान तत्त्वज्ञानाच्या पद्धतीत होत होत एक धार्मिक रुप घेऊ लागले. यातूनच इसवी सन पूर्व सहाव्या शतकांत जैन व बौद्ध या अवैदिक धर्मांची निर्मिती झाली. जैन धर्माची आपण वैदिक धर्माशी तुलना करतो तेंव्हा काही फरक स्पष्टपणे जाणवतात. जैन वेदप्रामाण्य मानत नाही. परमेश्वर अथवा सृष्टीचा निर्माता ही संकल्पना त्यांना मान्य नाही. यज्ञयाग व त्यातील पशुबळी यांना त्यांचा अत्यंत कठोर विरोध आहे. वैदिकांमध्ये रूढ झालेली जाती व वर्ण व्यवस्था जैनांना अमान्य आहे. अहिंसा परमोधर्म हे त्यांचे महत्वाचे तत्व सांगता येते. वैराग्याची आराधना आणि आत्मज्ञान प्राप्ती होताच दिगंबरत्व स्वीकारण्याची शिकवण. स्त्रियांना विदुषी अथवा आर्जिका ( साध्वी,भिक्षुणी) होण्याचा म्हणजे मोक्षाचा अधिकार जैन धर्म देतो. दिगंबर जैन पंथाच्या मते,तर १९ वे तीर्थंकर श्री मल्लिनाथ हे म्हणजे एक स्त्री होती. मिथिला नगरीचा राजा कुंभ आणि त्याची राणी प्रभावती यांची पुत्री राजकुमारी मल्लीदेवी,म्हणजेच तीर्थकर मल्लिनाथ होय. श्वेतांबर पंथात यासंदर्भात वेगळी कथा प्रचलित आहे. जैनधर्माच्या विकासाचा विचार करता सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात येते,ती म्हणजे उपनिषदांची शिकवण. उपनिषदांमध्ये वैदिक तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध सर्वप्रथम आत्मा ही संकल्पना,आत्मकल्याणचा नवविचार विषद करण्यात आला. कठोपनिषद व मुंडकोपनिषदांत यज्ञयागाला स्पष्ट विरोध केलेला आहे. उपनिषदांमधील तत्त्वज्ञान वैदिक तत्त्वज्ञानाचे अंग असले,तरी हा फरक जाणवतो. उपनिषदांमधील आत्मकल्याणविषयक तत्त्वज्ञानाचा जैनधर्मावर प्रभाव दिसून येतो. मनुष्य साधनेने व शुद्ध विचार-आचरण यांनी स्वतःच देवत्व प्राप्त करू शकतो. त्याला देवत्व प्राप्त करण्यासाठी यज्ञयाग करून वस्तू-पशु आदि अर्पण करण्याची आवश्यकता नाही. तसेच कोणत्या मध्यस्थांची म्हणजेच पुरोहित म्हणवणा-या देवाच्या दलालांची अजिबात आवश्यकता नसते. जैन धर्मात हीच शिकवण निराळया स्वरूपात व्यक्त झाली आहे. वैदिक काळाच्या अखेरीस यज्ञविरोधी चळवळीने जोम धरला आणि आत्मकल्याणवादी तत्त्वज्ञानाला महत्व प्राप्त होत गेले. जैन धर्मात जे आत्मवादी तत्वज्ञान केंद्रवर्ती आहे,त्याचे उगमस्थान उपनिषदकालीन तत्वज्ञान सांगता येते. वैदिक वाङ्मयाचे अंग असणा-या उपनिषदांमध्ये प्राग्वैदिक काळातील आर्येतर अनेक गोष्टींचा,विचारांचा स्वीकार केलेला दिसून येतो. यातील अनेक विचार व आचार वैदिक धर्माशी जुळणारे नव्हते. उपनिषदतत्त्वज्ञानावर या विचारांचा प्रभावसुद्धा दिसून येतो. बौद्ध धर्माने तर आत्मा ही संकल्पनाच अस्वीकार केली आहे. यामुळे बौद्ध व जैन हे स्वतंत्र अवैदिक धर्म आहेत. अनार्य समाजातील क्षत्रिय विचारधारा ही प्रामुख्याने त्यांची जननी आहे. असे विचार अनेक अभ्यासकांनी मांडले आहेत. वैदिक काळाच्या शेवटी-शेवटी क्षत्रियांचे वर्चस्व सर्वच क्षेत्रांत वाढत चालले होते. त्या वेळच्या छोटया छोटया टोळयांमध्ये सांस्कृतिक समारंभाचे नेतृत्व ब्राहमणांऐवजी क्षत्रियांकडे आलेले होते. भारतीय उपखंडात जेंव्हा लोकशाही पद्धतीची जानपदे स्थापन झाली,तेंव्हा त्यांचे नेतृत्व नढवय्ये असलेल्या क्षत्रियांकडे आले. यामुळेच बहुधा उपनिषदांची शिकवण क्षत्रिय प्रजासत्ताकांमध्ये जास्त प्रमाणांत पसरली होती. अनेक विद्वानांनी उपनिषद तत्त्वज्ञान हे क्षत्रियांचे तत्त्वज्ञान मानले आहे. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनी क्षत्रियांनी हे यश संपादन केले होते. यामुळेच क्षत्रियांची जीवनदृष्टी व तत्त्वज्ञान उपनिषदांत व्यक्त झालेले आहे. भगवान बुद्ध आणि भगवान महावीर हे दोघेही क्षत्रिय वंशाच्या प्रजासत्ताक जानपदांचे राजकुमार होते. ही गोष्ट ही विशेषतः लक्षात घेतली पाहिजे. प्राचीन भारतीय धार्मिक वाङ्मयाचे अभ्यासक एच.याकोबी यांनी वैदिक,जैन व बौद्ध धर्मांचा तुलनात्मक अभयास करुन कांही समान तत्वे शोधून काढली आहेत. ती या तिन्ही धर्मांत सारखीच महत्वाची मानली आहेत. आत्म्याच्या पुनर्जन्मावर विश्वास,कर्मवाद,जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्ती,युगायुगांतून परमेश्वराचा अवतार. अवतारी परमेश्वर(जैन मताने तीर्थंकर) धर्ममताला बळकटी प्राप्त करुन देतात. यांतील पहिल्या तीन गोष्टी(पुनर्जन्म,कर्मवाद आणि मुक्तीचा प्रयत्न)अहिंसवादाशी संबंधीत आहेत. आर्यांच्या यज्ञप्रधान तत्त्वज्ञानाशी या तीन गोष्टी जुळणा-या नाहीत. यज्ञविरोधी क्षत्रियतत्त्वज्ञानाचा विकास होऊ लागल्यावर वैदिक धर्मात या तत्त्वांचा समावेश करण्यात आला असावा. असे प्रतिपादन काही अभ्यासक करतात. उपरोक्त सर्व विवेचनाचा एकच अर्थ काढता येता की,जैन तत्त्वज्ञानाची परंपरा प्राग्वैदिक काळापासून वैदिक काळाच्या अंतापर्यंत अनार्य समाजात अव्याहतपणे प्रवाहीत होती. भगवान महावीरांनी या परंपरेला संस्थात्मक धर्माच्या चौकटीत बसवले.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment